सोमवार, १ नोव्हेंबर, २०१०

माणूस म्हणून जगताना .......!!!


माणूस म्हणून जगताना 
हा एक हिशोब करुन तर बघा! 
“किती जगलो” याऐवजी “कसे जगलो”? 
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा! 
कधी असेही जगून बघा….. 

कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी 
समोरच्याचा विचार करुन तर बघा! 
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी 
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा! 
कधी असेही जगून बघा….. 

संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात 
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा! 
स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण 
कधीतरी बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर बघा! 
कधी असेही जगून बघा….. 

वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते 
कधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा! 
काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले? 
आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा! 
कधी असेही जगून बघा….. 

प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी? 
एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा! 
ज्या प्रेमाबद्दल सर्व जग कुतूहल करते 
त्या अथांग भावनेची व्याख्या करुन तर बघा! 
कधी असेही जगून बघा….. 

अतिसामान्य जीवन नशीबी असले म्हणून काय झाले? 
कधीतरी सामान्यातले असामान्य होण्याची जिद्द दाखवून तर बघा! 
चिमणीसारखा जन्म मिळाला असला तर काय झाले? 
आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करुन तर बघा! 
कधी असेही जगून बघा….. 

आयुष्य रोजच वेगवेगळे रंग उधळते 
त्या रंगांमधे आनंदाने रंगून तर बघा! 
तसे जगायला काय?कुत्रे-मांजरीही जगतात हो 
कधीतरी माणूस म्हणुन स्वतःच्या जगण्याचा उद्देश शोधून तर बघा! 
कधी असेही जगून बघा….. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा